उपनगराध्यक्ष अॅड. अनिल निरवडेकर यांनी दिले सावंतवाडीच्या नाट्यसंस्कृतीला नवे रूप; बॅरिस्टर नाथ पै सभागृहासाठी ९९ लाखांचा निधी

सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषदेच्या बॅरिस्टर नाथ पै सभागृहात नाटक आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करताना होणारी प्रेक्षक व कलाकारांची गैरसोय आता लवकरच दूर होणार आहे. उपनगराध्यक्ष अॅड. अनिल निरवडेकर यांनी नगराध्यक्ष पदाचा पदभार सांभाळत असताना केलेल्या विशेष पाठपुराव्यामुळे या सभागृहाच्या नूतनीकरणासाठी ९९ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून, लवकरच हे नाट्यगृह सुसज्ज होणार आहे.
बॅरिस्टर नाथ पै सभागृहात एखादे नाटक किंवा मोठा कार्यक्रम आयोजित केल्यास प्रेक्षकांसाठी आसनव्यवस्थेची मोठी अडचण निर्माण होत होती. हॉलमध्ये मोकळ्या जागेत प्लास्टिक खुर्चा टाकून प्रेक्षकांची सोय करावी लागत असे, जे गैरसोयीचे ठरत होते. तसेच, याठिकाणी कलाकारांसाठी ड्रेसिंग रूम आणि स्वच्छतागृहांची सोय असली, तरी तिथे आवश्यक पायाभूत सुविधांची मोठी वानवा होती. अनेक नामवंत कलाकारांनी आणि रसिकांनी या असुविधांबाबत वेळोवेळी नाराजी व्यक्त केली होती. या समस्यांची दखल घेत, तत्कालीन नगराध्यक्ष पदाचा पदभार असलेले उपनगराध्यक्ष अॅड. अनिल निरवडेकर यांनी स्वतः या विषयात लक्ष घातले. त्यांनी नगरपरिषद प्रशासनाला तातडीने पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले. हा प्रस्ताव तयार झाल्यानंतर त्यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे या निधीसाठी सातत्याने पाठपुरावा केला. या प्रयत्नांना यश आले असून जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ९९ लाख रुपयांचा भरीव निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून आता बॅरिस्टर नाथ पै सभागृहाची डागडुजी, कलाकारांसाठी आधुनिक ड्रेसिंग रूम आदी कामे करण्यात येणार आहे. लवकरच या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होणार असून, सावंतवाडीतील सांस्कृतिक चळवळीला यामुळे नवे बळ मिळणार आहे. हे सभागृह सुसज्ज व्हावे यासाठी अॅड. अनिल निरवडेकर सध्या विशेष प्रयत्नशील आहेत.