देवगड मेडिकल फाउंडेशन येथे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त भव्य मोफत आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने रविवारी, ८ मार्च २०२६ रोजी देवगड मेडिकल फाउंडेशन, देवगड येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिराचा एकूण १०३ रुग्णांनी लाभ घेतला.
हे शिबिर महाराष्ट्र ऑर्थोपेडिक असोसिएशन ( MOA ), IMA कणकवली, देवगड मेडिकल फाउंडेशन ( DMF ) आणि NAB आय हॉस्पिटल, देवगड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते. ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते.
या शिबिरात विविध क्षेत्रातील तज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी केली. त्यामध्ये डॉ. तन्मय आठवले (अस्थिरोगतज्ञ), डॉ. रिया जैन आठवले (फिजिशियन), डॉ. महेंद्र आचरेकर (शल्यचिकित्सक), डॉ. अर्पिता आचरेकर (स्त्रीरोगतज्ञ) आणि डॉ. ज्ञानेश्वर केदार (नेत्रतज्ज्ञ) यांनी सहभाग घेतला.
या शिबिरामध्ये रुग्णांसाठी बोन मिनरल डेन्सिटी टेस्ट, पल्मोनरी फंक्शन टेस्ट, ईसीजी, पेरिफेरल न्यूरोपथी तपासणी तसेच विविध रक्ताच्या तपासण्या पूर्णपणे मोफत करण्यात आल्या. याशिवाय सर्व रुग्णांना मोफत वैद्यकीय सल्ला देण्यात आला.


शिबिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे उपस्थित रुग्णांना बेसिक कार्डिओ पल्मोनरी रिससिटेशन (CPR) प्रशिक्षण देण्यात आले. आपत्कालीन परिस्थितीत जीव वाचवण्यासाठी CPR चे महत्व यावेळी समजावून सांगण्यात आले.
या आरोग्य शिबिराचे उद्घाटन अॅड. सौ. अन्वी कुलकर्णी, सौ. प्रियांका साळसकर, श्रीमती. निरुपमा नेने आणि डॉ. अर्पिता आचरेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाला डॉ. प्रकाश पाटोदेकर (वैद्यकीय अधीक्षक, शासकीय ग्रामीण रुग्णालय देवगड), डॉ. निनाद धुरी, श्री. प्रवीण सावंत (वरिष्ठ वाहतूक पोलीस अधिकारी) तसेच देवगडमधील अनेक मान्यवर नागरिक उपस्थित होते.
देवगड तालुक्यातील ज्येष्ठ डॉक्टरांचा देखील या शिबिराला मोठा पाठिंबा लाभला. त्यामध्ये डॉ. के. एन. बोरफळकर, डॉ. किरण मराठे, डॉ. केतकी जामसंडेकर, डॉ. रुपाली पोकळे, डॉ. मंगेश हिंदळेकर, डॉ. सुशांत चव्हाण, डॉ. रामदास बोरकर आणि डॉ. मनोज सरंग यांचा समावेश होता.
या शिबिराच्या यशस्वी आयोजनामध्ये देवगड मेडिकल फाउंडेशनच्या कर्मचाऱ्यांनीही महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यामध्ये सर्वेश मिठबावकर, अक्षता नागवेकर, कादंबरी काणेकर, स्नेहल कदम, भाग्यश्री घारकर, सुमेधा पालकर, शेफाली भगवत, सानिया शिंदे, सबुरी चव्हाण, रोशन कदम, सानिका चव्हाण, सोनाली ढोके, प्रसाद कदम, भारत सुतार आणि दशरथ हक्के यांचा सहभाग होता.
गेल्या अनेक वर्षांपासून देवगड मेडिकल फाउंडेशनतर्फे देवगड तालुक्यात १००० हून अधिक मोफत आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत, ज्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे.
या यशस्वी उपक्रमाबद्दल डीएमएफ हेल्थकेअर प्रा. लि. चे संचालक डॉ. सुनील आठवले व डॉ. मंजुषा आठवले यांनी सर्व रुग्ण, मान्यवर, डॉक्टर व सहकाऱ्यांचे आभार मानले आणि भविष्यातही अशा प्रकारची आरोग्य शिबिरे आयोजित करण्याचे आश्वासन दिले.