शिक्षक समितीच्या पाठपुराव्याला यश


जिल्हा परिषद शाळा ९ मार्चपासून सकाळच्या सत्रात

सिंधुनगरी : वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद शाळा सकाळच्या सत्रात सुरू करण्याच्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, जिल्हा शाखा सिंधुदुर्ग यांच्या मागणीला अखेर यश मिळाले आहे. प्रशासनाने याबाबत पत्रक काढून शाळा सकाळच्या सत्रात घेण्याच्या सूचना केल्या आहेत.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने दि. ४ मार्च २०२६ रोजी शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांना निवेदन सादर करून शाळा सकाळच्या सत्रात सुरू करण्याची मागणी केली होती. वाढत्या उन्हामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घ्यावा, अशी मागणी समितीने केली होती.
या निवेदनाची दखल घेत जिल्हा परिषद सिंधुदुर्ग प्रशासनाने यासंदर्भात पत्रक काढून सोमवार दि. ९ मार्च २०२६ पासून जिल्हा परिषद शाळा सकाळच्या सत्रात सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार शाळांची वेळ सकाळी ७.०० ते ११.१५ अशी ठेवण्यात आली आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना वाढत्या उष्णतेपासून दिलासा मिळणार असून शिक्षण प्रक्रियाही अधिक सुलभ होणार आहे. शिक्षक समितीच्या पाठपुराव्यामुळे ही मागणी मान्य झाल्याने शिक्षकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.