आता सुट्ट्या पैशांची मिटणार चिंता ; एसटी महामंडळ…

शासनाची सर्व कार्यालये हळूहळू कॅशलेस होत असताना महाराष्ट्र राज्य परिवहन एसटी महामंडळातही ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. आता एसटीमधील प्रत्येक वाहकाकडे त्यांच्या जवळील मशीनमध्ये क्यूआर कोडची सोय उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे सुट्या पैशांची चिंता आणि त्यावरून होणारे वाद आता होणार नाहीत. एसटी बसमधील वाहकाकडे प्रवास करताना अनेकदा तिकिटाचे पैसे सुट्टे देण्या-घेण्यावरून वाहक आणि प्रवाशांमध्ये नेहमीच वादावादी होत असते. त्याचा प्रवाशांना मन:स्ताप होत असतो; परंतु आता प्रवासी एसटीचे तिकीट खरेदी करताना डिजिटल पेमेंट करू शकणार आहेत. जिल्ह्यात ही सुविधा वाहकांच्या तिकीट यंत्रावर करण्यात आली आहे.या सुविधेस सध्या प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळत असून, मोठ्या कटकटीतून सुटका झाल्याचे समाधान प्रवाशांना मिळत आहे. मॉलपासून चहाच्या टपरीपर्यंत अन् भाजी विक्रेत्यांपासून रिक्षाचालकांपर्यंत सध्या सगळ्यांकडेच डिजिटल पेमेंट वॉलेट, यूपीआय असल्यामुळे रोख पैशांची गरज कमी झाली आहे. एसटीचा क्यूआर कोड सर्व पेमेंट वॉलेटला चालणार आहे. त्यामुळे गुगल पे असो वा फोन पे अशा प्रत्येक वॉलेटवरून पैसे दिले जाऊ शकतात.