शास्त्रीय, नाटय अभंग या तीनही संगीत प्रकारावर विलक्षण हुकमत असलेले, आपल्या भावपूर्ण गायन शैलीने चार दशकांहून अधिक काळ रसिकांना आनंद देणारे तपस्वी गायक पंडित प्रभाकर कारेकर यांचे बुधवारी रात्री निधन झाले. ते 80 वर्षांचे होते. त्यांचे ‘प्रिये पाहा’ नाटय़गीत खूप गाजले. या गाण्याने पंडित कारेकर यांना खूप प्रसिद्धी आणि नावलौकिक मिळाला. हे नाट्यगीत ऐकल्याशिवाय प्रेक्षक त्यांची मैफल संपवूनच देत नसत. याशिवाय ‘बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल’, ‘मधु मिलनात या, ‘मर्मबंधातली ठेव ही, ‘नभ मेघांनी आक्रमिले’, ‘वक्रतुंड महाकाय’ या आणि अशा त्यांच्या अनेक गाण्यांवर रसिकांनी भरभरून प्रेम केले. पंडित कारेकर यांच्या निधनाने शास्त्रात्य संगीतातील वैभवशाली युगाचा अंत झाल्याची हळहळ व्यक्त होत आहे.









